स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोमधील व्याख्यानाचा स्मरणदिन यावेळी अत्यंत महत्त्वाच्या वेळी आला आहे. देशाच्या स्वातंत्र्याचं ७५ वर्ष आणि जगात शतकाहून एकदाच येणाऱ्या जागतिक महासाथीचा मुकाबला करीत असताना जगाच्या नकाशावर पुन्हा होत असलेला देशाच्या नव्या प्रतिमेचा उदय या त्या दोन घटना. त्याच्या जोडीला आज १८९३ मध्ये सक्रिय असलेल्या घटकांचा पुनरुद्भव झाला आहे. विवेकानंदांनी आपल्या व्याख्यानामध्ये याच शक्तींच्या भारताबद्दलच्या विपरीत कल्पनांना व मतांना आव्हान दिले होते. या शक्ती त्यावेळी सभ्य भारताची राक्षसी प्रतिमा तयार करीत होत्या, हिंदू संस्कृतीची बदनामी करीत होत्या व केवळ आपणच भारताला अंधश्रद्धेच्या दलदलीतून बाहेर काढू शकतो, असा दावाही करीत होत्या. विवेकानंदांचे भाषण एक प्रकारे देशाच्या संघटितपणे सुरू असलेल्या बदनामीविरुद्ध एक आव्हानच होते.
या भारतविरोधी घटकांचे बौद्धिक वंशज आज तोच अजेंडा पुढे रेटत आहेत. मात्र, त्यातील मूलभूत फरक हा आहे, की आज त्यांचा सामना स्वतंत्र, उदयोन्मुख आणि जागतिक स्तरावर स्वतःच्या शक्तीची जाणीव झालेल्या भारताशी आहे ! हा वेगाने प्रगती करणारी लोकशाही देश असून, तो स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील शक्तिशाली भारताला मूर्तरुप देण्याचे काम करीत आहे. आजचा भारत विचारवंत एस. गुरुमूर्ती म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘आपल्या मानसिक जोखडातून व शक्तीबद्दलच्या शंकेतून मुक्त झालेला व जगाला आपण नेतृत्व करण्यास सज्ज असल्याचे स्पष्टपणे सांगणारा देश झाला आहे. भारत जगाला विचार देणारा व जगाच्या प्रगतीत योगदान देणारा झाला असून, केवळ विचार आयात करणारा आणि बाहेरच्या जगाचे विचार आपले मानणारा राहिलेला नाही.’’ सध्या देश ज्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे, ते पाहिल्यास गुरुमूर्ती यांचे विचार योग्य असल्याचाच पुरावा मिळतो.
कोरोना आणि भारताची कामगिरी
स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील भाषणाचे स्मरण हाच आयाम अधिक योग्य आणि ठामपणे अधोरेखित करतो. जग कोरोनाविरुद्धच्या लढाईत चाचपडत असताना भारताने या महासाथीशी कशाप्रकारे दोन हात करावेत, लशीचे उत्पादन, वैविध्यपूर्ण व प्रचंड लोकसंख्येला तिचे वितरण कसे करावे याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. भारताने एका वर्षाच्या आत लशींची निर्मिती करण्यात यश मिळवले व तिचे मोठ्या लोकसंख्येला सुनियोजित वितरण केले. हे देशाचा स्वतःबद्दलचा विश्वास, प्रगती व उत्थानाचे निर्देशक आहे. पश्चिमेतील विचारवंत कोरोना महासाथीनंतर जगाचे स्वरूप कसे असेल याची चिंता करीत असताना भारताने मात्र आपली भूमिका काय असेल, हे आधीच सुनिश्चित केले आहे.
आपल्याला याचे स्मरण असेलच, की पंतप्रधान मोदी हे पहिले जागतिक नेते होते, ज्यांनी सध्याच्या कोरोनाच्या महासाथीविरोधात व भविष्यातील साथींच्या विरोधात लढण्यासाठी जागतिक आघाडी स्थापन करण्याची गरज असल्याचे सांगितले होते. त्यांनी जागतिकीकरणाचा मानव केंद्रित, शोषण न करणारा, उदात्त असा नवा दृष्टिकोन आणि आराखडा तयार करावा असा आग्रह धरला होता. त्यांनी जागतिक नेत्यांना कोरोना जात, पंथ, रंग, भाषा किंवा सीमा पाहात नसल्याने आपला त्याला असलेला प्रतिसाद आणि वागणूक एकता आणि बंधुता या दृष्टिकोनातूनच असावी, असे सांगितले होते. या परिस्थितीत आपण एकी दाखवली पाहिजे, आपल्या जागतिक समृद्धी आणि सहकार्याच्या केंद्रस्थानी मनुष्यच असला पाहिजे आणि वैद्यकीय संशोधनाचे आणि विकासाचे फायदे सर्वांना मुक्तहस्ते व मोफत मिळाले पाहिजेत, असा आग्रहही त्यांनी धरला होता. सर्वसमावेशक, प्रतिसादक्षम व मानवी चेहरा असलेली आरोग्य व्यवस्था निर्माण व्हावी व नवी आपत्ती निवारण नियमावली तयार करावी. तसेच, ती जागतिक आरोग्य संघटनेसारख्या बिगर सहकारी संस्थांनी राबवावी ही पंतप्रधानांची सूचना सर्वाधिक विधायक व रचनात्मक होती.
भारताची भूमिका निर्णायक
जागतिक विचारवंत हेन्री किसिंजर आणि जोसेफ निये या ‘सॉफ्ट पॉवर’ संकल्पनेच्या निर्मात्यांनी पंतप्रधान मोदी यांचेच विचार मांडले व त्याची बातमी मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आली. निये यांनी अमेरिकेने कोरोनाग्रस्तांना मदतीची मोठी योजना आखावी व ती ‘मार्शल प्लॅन’चे वैद्यकीय स्वरूप असावी, असे सांगितले. तर, हेन्री किसिंजर म्हणाले, ‘‘नेत्यांनी सहकार्याची भूमिका स्वीकारावी व त्यातून जागतिक स्तरावर लवचिकता निर्माण व्हावी.’’ निये यांनी इतरांवर सत्ता गाजविण्याऐवजी इतरांबरोबर सत्तेत भागीदारी ही संकल्पना मांडली व त्याचबरोबर एकमेकांतील सहकार्य वृद्धिंगत होण्यासाठी द्वीपक्षीय व बहुपक्षीय आराखडा तयार करण्याची सूचना केली. ही सर्व परस्पर सहकार्याची व ‘सॉफ्ट पॉवर’ला बळ देणारी धोरणे ठरतील व त्यातून महासाथीच्या निमित्ताने जग नव्या भू-राजकीय दिशेने मार्गक्रमण करेल. खरे तर, एस. गुरुमूर्ती यांच्या मते, कोरोना काळात जगभरात पूर्वी मांडल्या गेलेल्या अनेक संकल्पना आणि बदल उघडे पडले आहेत. ते म्हणतात, ‘‘पश्चिमेकडील देशांच्या गृहीतकांच्या आधारे जगभरात केलेल्या १९९० नंतरच्या प्रयोगांतील फोलपणा आता समोर आला आहे.
मात्र, आज भारताचा लोकशाही आणि त्याचबरोबर लोकशाही संस्थाही बळकट झाल्या आहेत. भारताच्या लोकशाही आराखड्याने व तत्त्वांनी जगाचे लक्ष वेधले आहे.’’ फ्रान्सिस फुकुयामा या पश्चिमेकडील विचारवंताच्या मतांनाही मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. त्यांच्या मते, ‘‘जगातील सत्तेचा केंद्रबिंदू पूर्वेकडे सरकण्यास सुरवात होईल, कारण पूर्व आशियाने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात युरोप व अमेरिकेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. भारताने मोठ्या लोकसंख्येसारखी आव्हाने असताना प्रत्येक पातळीवर स्थिती कशी हाताळावी त्याचे आदर्श मॉडेल जगाला दिले.’’ या संकटसमयी देश आपल्या लोकशाही मूल्यांशी बांधील राहिला, संघीय रचनेचा आदर केला गेला व आपल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्षमतांचाही उपयोग केला गेला. पंतप्रधान मोदी यांनी ‘आशियाचे दशक’ यासंदर्भातही वक्तव्य केले व त्यात भारत खूप महत्त्वाची व निर्णायक भूमिका बजावणार असल्याचेही सांगितले होते.
भारताने पश्चिमेकडील देशांच्या गृहीतकांना आव्हान दिले पाहिजे, हा स्वामी विवेकानंदांच्या दृष्टिकोनातील एक महत्त्वाचा घटक होता. ‘भारताने स्वतःचा आराखडा घेऊन पुढे यावे, स्वतःचा शोध पुन्हा घ्यावा व आपल्या लोकशाही अनुभवाचा उपयोग करीत जगभरात पुनःस्थापित व्हावे. भारताचे महत्त्व जग शेवटी जाणेलच,’ असे ते म्हणत. ‘इंडिया फर्स्ट’ हा राष्ट्र उभारणीचा मंत्र दिला गेल्यानंतर गेल्या काही वर्षांत देशात मोठे परिवर्तन घडून येताना दिसत आहे…
(सदराचे लेखक ‘डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रिसर्च फाउंडेशनचे’ संचालक आहेत )
(अनुवाद : महेश बर्दापूरकर )